लग्नसराईत सोन्याचा झटका! आठवडाभरात ₹3,666 ने वाढ; 10 ग्रॅम 1.47 लाखांच्या पार

एप्रिल-मे म्हणजे लग्नसराईचा हंगाम… पण यंदा या आनंदावर सोन्याच्या वाढत्या दरांनी मोठं सावट टाकलं आहे. कारण गेल्या आठवडाभरात सोन्याच्या किंमतीत तब्बल ₹3,666 ची वाढ झाली असून, 10 ग्रॅम सोन्याचा दर आता 1.47 लाखांच्या पार पोहोचला आहे.
दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर ₹1,51,080 वर पोहोचला आहे, तर मुंबईत हा दर ₹1,50,930 इतका नोंदवला गेला आहे. त्यामुळे लग्नासाठी खरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांपासून उच्चवर्गीयांपर्यंत सर्वांच्याच खिशाला मोठी कात्री बसणार आहे.
विशेष म्हणजे, मार्च महिन्यात सोन्याच्या दरात जवळपास ₹12,000 ची घट झाली होती. मात्र एप्रिलच्या सुरुवातीलाच बाजारात पुन्हा तेजी दिसून येत आहे. 27 मार्च रोजी 10 ग्रॅम सोन्याचा दर सुमारे ₹1.43 लाख होता, जो आता 5 एप्रिलपर्यंत वाढून ₹1.47 लाखांवर गेला आहे.
फक्त सोनंच नाही, तर चांदीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. चांदीत तब्बल ₹5,000 ची वाढ झाली असून, सध्या चांदीचा दर ₹2.50 लाख प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे.
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार आणि सरकारच्या धोरणांमुळे पुढील काळातही सोनं-चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लग्नसराईच्या काळात खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांनी आता अधिक सावध राहण्याची गरज आहे.



