खंडाळा देवीत हनुमान जयंतीचा जल्लोष! भक्ती, परंपरा आणि संस्कृतीचा अद्भुत संगम; हजारो भाविकांची उपस्थिती

मेहकर (बुलढाणा)
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथे यंदाची हनुमान जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. परंपरा, श्रद्धा आणि संस्कृतीचा सुंदर मिलाफ असलेल्या या उत्सवाने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. हजारो भाविकांच्या उपस्थितीने गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
खंडाळा देवी गाव अक्षरशः भगव्या रंगात रंगून गेले होते. गावातील प्रसिद्ध जगदंबा देवी ठाण परिसरातील मारुती मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. हनुमानाच्या प्राचीन मूर्तीवर विधिवत जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर वेदघोष आणि मंत्रोच्चारात पूजाअर्चा पार पडली.
दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. पताका, फुलांची आरास आणि रोषणाईमुळे वातावरण अधिकच भक्तिमय आणि प्रसन्न झाले होते.
हनुमान जन्मोत्सवानिमित्त गावात विविध पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गावातील स्थानिक कलाकारांनी महाभारत, राम-लक्ष्मण कचेरी तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सोंग सादर केली. या सोंगांनी उपस्थितांना केवळ मनोरंजनच नाही, तर इतिहास आणि संस्कृतीची जाणीव करून दिली.
ग्रामस्थांनी या सर्व कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळ व संध्याकाळी पार पडलेल्या आरतीमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात दंग झाला होता.
खंडाळा देवी येथील हनुमान जयंती उत्सवाने पुन्हा एकदा परंपरा, एकता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला आहे.
अशाच सकारात्मक आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी पाहत राहा – सिटी न्यूज



