मध्यरात्री झुणका भाकर झोपडीत हल्ला; दोघांवर प्राणघातक हल्ला, एकाची प्रकृती गंभीर

नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात मध्यरात्री खुनाच्या प्रयत्नाची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोलार नदीजवळील झुणका भाकर झोपडी परिसरात उदय लॉनसमोर झोपलेल्या दोन व्यक्तींवर अज्ञात आरोपींनी विटा आणि दगडांनी हल्ला केला.
ही घटना 31 मार्च रोजी घडली असून, या हल्ल्यात फिरोज शेख (वय 46, रा. उप्पलवाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत. दुसऱ्या जखमी व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.
घटनेनंतर दोन्ही जखमींना तातडीने नागपूर येथील मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी खापरखेडा पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.



