अमरावतीत इंधनाचा तुटवडा नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन

अमरावती:
अमरावती शहरासह जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे. शहरातील काही पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याच्या चुकीच्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये अनावश्यक भीती निर्माण होऊन पंपांवर गर्दी होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
प्रशासनाकडून प्रत्यक्ष पाहणी
जिल्हा प्रशासनाने शहरातील अग्रसेन पेट्रोल पंप, आयटिया कॉलेज जवळील पंप तसेच राजेश आणि विदर्भ गॅस एजन्सींना प्रत्यक्ष भेटी दिल्या. या ठिकाणी इंधनाचा आणि सिलेंडरचा साठा मुबलक प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी गॅस एजन्सी आणि पेट्रोल पंप मालकांना पिण्याचे पाणी, सावलीसाठी शेड आणि बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्याचे कडक निर्देशही देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केलेल्या महत्त्वाच्या सूचना:
• अफवांकडे दुर्लक्ष करा: सोशल मीडियावरील कोणत्याही चुकीच्या संदेशावर किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नका.
• साठा करू नका: भीतीपोटी इंधनाचा अनावश्यक साठा करण्याचा प्रयत्न करू नका.
• गर्दी टाळा: पेट्रोल पंपांवर विनाकारण गर्दी करू नका, जेणेकरून वाहतूक कोंडी किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.
• कायदेशीर कारवाई: अफवा पसरवणे किंवा चुकीची माहिती प्रसारित करणे हा दंडनीय अपराध असून, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.
जिल्हा प्रशासनामार्फत इंधन पुरवठा साखळीवर सतत देखरेख ठेवली जात असून पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी शांतता व संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.



