नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली अटकेत; ‘Gen Z’ आंदोलनातील मृत्यू प्रकरणी कारवाई

काठमांडू (प्रतिनिधी):
नेपाळमध्ये ‘Gen Z’ आंदोलनादरम्यान झालेल्या मृत्यू प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून, माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि माजी गृहमंत्री रमेश लेखक यांना पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या निष्काळजीपणामुळे झालेल्या मृत्यूंसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाच्या शिफारशींनुसार पोलिसांनी ही अटक केली असल्याचे सांगण्यात आले.
या आंदोलनात एकूण ७६ जणांचा मृत्यू झाला होता, त्यापैकी ८ सप्टेंबर रोजी पोलिसांच्या गोळीबारात १९ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.
दरम्यान, या अटक कारवाईच्या एक दिवस आधीच राष्ट्रिया स्वतंत्र पक्षाचे नेते बलेन्द्र शाह यांच्या नेतृत्वाखाली नेपाळमध्ये नव्या सरकारची शपथविधी पार पडली आहे. आंदोलनानंतर सहा महिन्यांनी ही राजकीय घडामोड घडली आहे.
या कारवाईमुळे नेपाळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



