होर्मुज तणावातही भारताला दिलासा; 47 हजार मेट्रिक टन LPG घेऊन दोन जहाजे गुजरातमध्ये दाखल

नवी दिल्ली/गुजरात (प्रतिनिधी):
पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि होर्मुज जलडमरूमध्यातील सुरक्षा चिंतेच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. 47,000 मेट्रिक टन द्रवरूप पेट्रोलियम वायू (LPG) घेऊन दोन भारतीय जहाजे शनिवारी गुजरातमधील वाडिनार टर्मिनल येथे सुरक्षितपणे पोहोचली.
यामध्ये ‘MT Jag Vasant’ हे प्रमुख जहाज असून, ते आपला माल अँकरजवर दुसऱ्या जहाजात ‘शिप-टू-शिप’ (STS) ऑपरेशनद्वारे हस्तांतरित करणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान भारतीय नौदल सतर्क अवस्थेत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, या व्यापारी जहाजांना सुरक्षित मार्ग मिळावा यासाठी भारतीय नौदलाची युद्धनौके सज्ज ठेवण्यात आली होती आणि गरज भासल्यास तात्काळ मदतीसाठी तयार होती. आगामी काळात अशा आणखी जहाजांच्या आगमनाची शक्यता असून, त्यामुळे देशातील ऊर्जा पुरवठा स्थिर राहण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्या 24 तासांत खाडी क्षेत्रात कोणत्याही भारतीय जहाजाशी किंवा भारतीय नाविकांशी संबंधित कोणतीही अप्रिय घटना घडलेली नाही.
सध्या फारसच्या आखातात 20 भारतीय ध्वजधारी जहाजे कार्यरत असून, त्यावर सुमारे 540 भारतीय नागरिक कार्यरत आहेत आणि ते सर्व सुरक्षित असल्याची माहितीही त्यांनी दिली.



