नागपूर जिल्ह्यात गव्हाच्या शेताला भीषण आग; ६५-७५ एकर पीक जळून खाक

नागपूर जिल्हा मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पारशिवनी तालुका येथील टेकडी परिसरात गव्हाच्या शेताला भीषण आग लागून सुमारे ६५ ते ७५ एकर उभं पीक जळून खाक झालं आहे.
ही घटना कान्हान पोलीस ठाणे हद्दीत घडली असून, अज्ञात कारणांमुळे लागलेली आग काही क्षणातच भीषण स्वरूप धारण करत पसरली. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे आगीने झपाट्याने संपूर्ण परिसर व्यापला.
घटनेची माहिती मिळताच कान्हान, कांद्री आणि कामठी येथील अग्निशमन दल आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, ते पोहोचेपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
या आगीत अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेले पीक जळून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. बाधित शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आता शासनाकडून शेतकऱ्यांना कितपत मदत मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



