200 फूट उंच टॉवरवर चढून आरक्षणासाठी आंदोलन!

बुलढाणा जिल्ह्यात धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. मुंबईतील आझाद मैदानावर धनगर आरक्षणाचे नेते दीपक बोराडे यांनी आंदोलन सुरू केले असून, राज्यभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मेहकर तालुक्यातील जानेफळ (खामगाव रोड) येथे आंदोलन सम्राट यशवंत सेनेचे बुलढाणा संपर्कप्रमुख गजानन बोरकर यांनी थेट टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे.
विशेष म्हणजे, बोरकर हे तब्बल 200 फूट उंच टॉवरवर चढले असून, त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “जोपर्यंत धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मी खाली उतरणार नाही.” या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांची मोठी गर्दी घटनास्थळी जमली आहे.
तसेच प्रशासन आणि पोलीस यंत्रणाही सतर्क झाली असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात वातावरण तापत चालले असून, या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन दिवसेंदिवस आक्रमक होत चालले आहे. सरकार या आंदोलनावर काय भूमिका घेणार, आणि आंदोलनकर्त्यांची मागणी कधी पूर्ण होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



