झुलेलाल जयंतीनिमित्त भव्य निशुल्क आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर

अमरावती शहरात झुलेलाल जयंती महोत्सवानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत भव्य निशुल्क आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. स्वर्गीय लिलाबेन मंगलजीभाई पोपट यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रामपुरी कॅम्प येथील बजाज धर्मशाळा येथे हे शिबिर पार पडले. हरिना नेत्रदान समितीच्या वतीने आयोजित या उपक्रमांतर्गत नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच अत्यल्प दरात चष्म्यांचे वितरणहि करण्यात आले. या शिबिरात एकूण १५२ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली, तर ९७ नागरिकांना चष्मे वितरित करण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बंटी पारवानी आणि त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला चंद्रकांत पोपट, शरद कासट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच विविध तज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन केले. या शिबिरामुळे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून अशा उपक्रमांची गरज आजच्या काळात अधिक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



