धामणगावात चना खरेदीवरून गोंधळ; प्रहारचा आरोप, काही काळ प्रक्रिया ठप्प

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे चना खरेदी प्रक्रियेवरून मोठा वाद उफाळून आला आहे. नाफेड मार्फत सुरू असलेल्या खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आला असून, या मुद्द्यावरून प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
धामणगाव परिसरात गुरु गजानन ऍग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने चना खरेदी सुरू आहे. मात्र, काही शेतकऱ्यांकडून तक्रारी समोर आल्यानंतर वातावरण तापले. प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख सुरज गंथळे यांनी खरेदी केंद्रावर नाफेडचे अधिकारी अनुपस्थित असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे सांगितले.
यानंतर प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते थेट खरेदी केंद्रावर दाखल झाले आणि कंपनीच्या संचालकांना जाब विचारला. या दरम्यान वाद चिघळत गेला आणि काही काळासाठी खरेदी प्रक्रियेतील काटा बंद ठेवण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक गिरीश ताथोड कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि वाद निवळल्यानंतर खरेदी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली.
दरम्यान, कंपनीचे संचालक कमल टावरी यांनी सर्व आरोप फेटाळून लावत नाफेडच्या नियमांनुसारच खरेदी होत असल्याचे स्पष्ट केले. तर दुसरीकडे, प्रहार संघटनेने पुन्हा असा प्रकार घडल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे काही काळासाठी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, हा वाद आता राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी खरेदी प्रक्रिया पारदर्शक होणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.



