बिबट्या गोठ्यात घुसला, पण वनविभागच ठप्प!

नागपूर जिल्ह्यातील देवलापार वनपरिक्षेत्रातील दुयापार गाव… शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अचानक भीतीचं सावट पसरलं जंगलातून आलेला बिबट्या थेट मनोज सांगोडे यांच्या घराशेजारील गोठ्यात शिरला. घरातील लहान मुलगा अर्णवने बिबट्याला पाहताच कुटुंबीयांना सतर्क केलं. क्षणात गावात खळबळ उडाली, ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली. रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. पण इथूनच सुरू झाली खरी बिबट्याला बधिर करण्यासाठी आणलेली ‘डार्ट सिस्टिम’ पूर्णपणे निष्क्रिय ठरली कारण आवश्यक औषधेच कालबाह्य होती! केटामाइन आणि झायलाजीन सारखी महत्त्वाची औषधे उपलब्ध नव्हती…मग प्रश्न असा — वनविभाग अशा परिस्थितीसाठी तयार आहे का? दरम्यान, सहा तास बिबट्या गोठ्यातच ठाण मांडून बसला होता. गावकरी भीतीच्या छायेत, या घटनेत आणखी एक गंभीर बाब समोर आली, रेस्क्यू टीम आणि स्थानिक वनअधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव. औषध नसल्याची माहिती आधीच देण्यात आली होती, तरीही टीम घटनास्थळी का आली?
याचं स्पष्ट उत्तर कोणाकडेच नाही. नागपूर जिल्ह्यात वाघ आणि बिबट्यांच्या घटना वाढत आहेत आणि अशा वेळी वनविभागाची ही निष्काळजीपणा चिंताजनक आहे. आता मोठा सवाल — जबाबदारांवर कारवाई होणार का? आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार का?



