खेळता खेळता चिमुकली बेपत्ता, शेजाऱ्याच्याच घरात सापडला मृतदेह

दारव्हा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. घराजवळ खेळत असलेली एक चिमुकली अचानक बेपत्ता होते… कुटुंबीय आणि पोलिसांकडून शोधमोहीम सुरू होते… आणि काही तासांतच जे समोर येतं, ते पाहून सगळेच हादरून जातात. त्या चिमुकलीचा मृतदेह शेजाऱ्याच्याच घरात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत सापडतो.
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बोथ या गावात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शिवाणी पंकज जाधव असे या निष्पाप चिमुकलीचे नाव आहे. शनिवारी शिवाणी आपल्या घराजवळ खेळत होती. नेहमीप्रमाणे खेळत असताना ती अचानक बेपत्ता झाली. बराच वेळ उलटल्यानंतरही ती घरी न परतल्याने कुटुंबीयांच्या काळजाचा ठोका चुकला. आई-वडिलांनी गावभर शोधाशोध सुरू केली. नातेवाईक आणि गावकऱ्यांनीही शोध मोहिमेत सहभाग घेतला. मात्र शिवाणीचा काहीच पत्ता लागला नाही. यानंतर दारव्हा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली.
जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गावात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं. घराघरांत तपास सुरू झाला. दरम्यान, संशयाच्या आधारे काही घरांची झडती घेण्यात आली. आणि याच वेळी एक धक्कादायक सत्य समोर आलं, गावातील कैलास जाधव आणि सोनू जाधव यांच्या घराची तपासणी केली असता, शिवाणीचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला.
हा प्रकार समोर येताच संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. निष्पाप चिमुकलीचा असा निर्दयी अंत झाल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित आरोपी कैलास विलास जाधव आणि सोनू विलास जाधव यांना ताब्यात घेतलं आहे.
याशिवाय आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या २४ तासांत या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. सध्या हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात आली, याचा तपास सुरू आहे.
या घटनेमुळे चार वर्षांपूर्वी आर्णी येथे घडलेल्या ‘मानवी’ प्रकरणाची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे. त्या प्रकरणातही शेजाऱ्यांनीच एका चिमुकलीचा खून करून मृतदेह लपवून ठेवला होता. बोथ गावातील ही घटना पुन्हा एकदा समाजाला हादरवून सोडणारी ठरली आहे.



