९ तासांत दिशा इंटरनॅशनल आय बँकेत दोन नेत्रदान; दु:खातूनही मानवतेचा उज्ज्वल संदेश

अमरावती येथील स्व.श्री. साहेबराव वासुदेवराव गजभिये आणि स्व.श्री. यादवराव बापूराव देशमुख यांचे नुकतेच निधन झाले. कुटुंबातील व्यक्तीच्या निधनाने निर्माण होणाऱ्या दुःखाच्या छायेतही गजभिये व देशमुख परिवारांनी मानवतेचा उज्ज्वल आदर्श घालून दिला. आपल्या प्रिय व्यक्तींच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि गरजूंना या सुंदर जगाचे दर्शन घडावे, या उदात्त भावनेतून दोन्ही कुटुंबांनी नेत्रदानाचा निर्णय घेतला.
यासाठी त्यांनी दिशा एज्युकेशन फाऊंडेशन संचालित, अमरावती येथील धर्मदाय दिशा इंटरनॅशनल आय बँकेशी संपर्क साधला. दिशा ग्रुपचे सचिव श्री. स्वप्निल अरुण गावंडे, आय बँकेचे मेडिकल डिरेक्टर डॉ मनिष तोटे, डेप्युटी मेडिकल डायरेक्टर डॉ. अंकित हरवानी, तसेच श्री. हिमांशू बंड व श्री. अनिल देशमुख यांनी तत्परतेने पुढाकार घेत मरनोत्तर नेत्रदानाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. अवघ्या ९ तासांच्या कालावधीत दोन नेत्रदान पूर्ण होणे ही अत्यंत उल्लेखनीय बाब ठरली.
या पवित्र कार्याबद्दल दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे आणि सचिव श्री. स्वप्निल अरुण गावंडे यांनी दोन्ही कुटुंबांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच, मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार नेत्रदानाचे अधिकृत प्रमाणपत्रही कुटुंबियांना प्रदान करण्यात आले.
या सेवाभावी कार्यात गजभिये परिवारातील श्री. संदीप गजभिये, श्री. विनय सूर्यवंशी, कु. निकिता वहाने तसेच देशमुख परिवारातील श्री. अभिषेक देशमुख, श्री. चंद्रशेखर देशमुख, श्री. राजेंद्र वानखडे यांसह इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्व. गजभिये व स्व. देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली.
भारतामध्ये अंधत्व ही गंभीर समस्या आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कोर्नियल अंधांना दृष्टी मिळू शकते. त्यामुळे नेत्रदान ही अत्यंत महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे. मृत्यूनंतर सहा तासांच्या आत नेत्रदान करता येते. त्यामुळे अशा प्रसंगी तात्काळ आय बँकेशी संपर्क साधणे आवश्यक आहे. मृत व्यक्तीचे डोळे बंद ठेवावेत, त्यावर ओल्या कापसाचे बोळे ठेवावेत, डोक्याखाली दोन उशा ठेवाव्यात, पंखा बंद ठेवावा (ए.सी. सुरू ठेवू शकता) अशी प्राथमिक काळजी घ्यावी.



