नाशिकचा भोंदू ज्योतिषी अशोक खरात प्रकरण उघड; शोषण, ब्लॅकमेलिंग आणि राजकीय कनेक्शनवर खळबळ

नाशिकचा भोंदू ज्योतिषी अशोक खरात… ज्याचे पाप आता देशासमोर उघड होत आहे. महिलांचे शोषण, ब्लॅकमेलिंग, जमीन बळकावणे आणि कथित राजकीय कनेक्शन… या सर्व धक्कादायक बाबींचा पर्दाफाश करणारा हा आमचा स्पेशल रिपोर्ट…
भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांचे शोषण, खंडणी आणि अघोरी विधींच्या माध्यमातून लोकांना जाळ्यात ओढणाऱ्या नाशिकच्या स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरातचे साम्राज्य आता कोसळताना दिसत आहे.
या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक (SIT) मार्फत सुरू असून, तपासाची सूत्रे आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी हाती घेतल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. खरातच्या घरातून पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि सुमारे ८ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
तपासादरम्यान १०० हून अधिक अश्लील व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओंच्या आधारे महिलांना ब्लॅकमेल केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाला राजकीय वळणही मिळाले आहे. विरोधकांचा आरोप आहे की राज्यातील काही मंत्र्यांचे खरातशी संबंध होते. काही नेते त्याच्याकडे सल्ल्यासाठी जात होते, तर काहींची व्यावसायिक भागीदारीही असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या सर्व गोष्टींचे धागेदोरे तपासात उलगडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा मानला जाणारा खरातचा पीए नीरज जाधव याला पोलिसांनी शिर्डीतून ताब्यात घेतले आहे. नीरज हा खरातच्या कारवायांचा जवळचा साक्षीदार असल्याने त्याच्याकडून अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
तसेच, काही राजकीय नेत्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर जादूटोणा करण्यात आल्याचा आरोप करत या प्रकरणाला आणखी वादग्रस्त वळण दिले आहे. ‘व्हीएसआर कनेक्शन’मुळे हा मुद्दा मंत्रालयापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याशिवाय, एका अल्पवयीन मुलीवर कथित अघोरी उपचार केल्याचा व्हिडिओ समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामुळे मानवी संवेदनांना धक्का बसला आहे.
दरम्यान, विरोधी पक्षाने हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
नाशिकच्या या भोंदूगिरी प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली असून, तपासातून आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



