citynewsLatest NewsMaharashtra

मुंबईत बांधकामस्थळी दुर्दैवी घटना; 8 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

मुंबई, प्रतिनिधी :
मुंबईतील मलाड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ठिकाणी पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून 8 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मलाडमधील कुरार व्हिलेज येथे ही घटना घडली. दिव्यांश राजेश मौर्य (वय 8) हा मुलगा खेळत असताना त्याचा चेंडू बांधकामस्थळी गेला. चेंडू आणण्यासाठी तो आत गेला असता, पाण्याने भरलेल्या खोल खड्ड्यात पडून त्याचा बुडून मृत्यू झाला.

ही घटना रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत बिल्डरच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप केले आहेत.

स्थानिकांच्या मते, संबंधित बांधकामस्थळी योग्य सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या. हा परिसर झोपडपट्टी आणि चाळींच्या जवळ असल्याने लहान मुलांची ये-जा कायम असते, तरीही संरक्षणाची कोणतीही योग्य व्यवस्था नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे बांधकामस्थळी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button