सुरतमध्ये गॅस टंचाईचा फटका; स्थलांतरित कामगार गावाकडे, वस्त्रोद्योगावर परिणाम

सुरत, प्रतिनिधी :
एलपीजी गॅस टंचाईमुळे गुजरातमधील सुरत शहरात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित कामगार गावाकडे परतू लागले आहेत. या परिस्थितीचा फटका शहरातील वस्त्रोद्योगाला बसत असून उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मूज बंद झाल्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. याचा थेट परिणाम भारतातील एलपीजी गॅस पुरवठ्यावरही झाला आहे.
गल्फ देशांकडून जगातील सुमारे 30 टक्के एलपीजी पुरवठा केला जातो. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे आयातीत घट झाली असून, या आठवड्यात एलपीजी आयात सुमारे 2.65 लाख मेट्रिक टनांवर घसरल्याचे वृत्त आहे. पर्यायी स्रोत शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गॅस टंचाईमुळे घरगुती तसेच कामगार वर्गाला स्वयंपाकासाठी गॅस मिळण्यात अडचणी येत आहेत. परिणामी, सुरतमधील अनेक स्थलांतरित कामगारांनी आपल्या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला आहे.
याचा थेट परिणाम शहरातील वस्त्रोद्योगावर होत असून, कामगारांच्या कमतरतेमुळे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गॅस टंचाई आणि स्थलांतरित कामगारांच्या पलायनामुळे सुरतच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.



