Helth CareLatest NewsNagpur

9 मार्चपासून HPV लसीकरण तर 7 मार्चपासून महसूल शिबिरे

नागपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आरोग्य आणि महसूल प्रशासनाकडून दोन महत्त्वाच्या मोहिमा राबविण्यात येणार आहेत. १४ वर्ष पूर्ण झालेल्या आणि १५ वर्षांखालील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम ९ मार्चपासून सुरू होत आहे. तर दुसरीकडे नागरिकांच्या घरापर्यंत महसूल सेवा पोहोचविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहे. या दोन्ही उपक्रमांची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.

नागपूर जिल्ह्यातील मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्ह्यात ९ मार्चपासून एचपीव्ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे. ही लसीकरण मोहीम १४ वर्ष पूर्ण झालेल्या आणि १५ वर्षांखालील मुलींसाठी आयोजित करण्यात येणार आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.

जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार असून ९ मार्चपासून पुढील ९० दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे. नागरिकांनी आपल्या मुलींना या लसीकरणासाठी नक्की आणावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, महसूल विभागाकडूनही नागरिकांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिकांच्या घरापर्यंत महसूल सेवा पोहोचविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर आयोजित करण्यात येत आहे. या शिबिराचा पहिला टप्पा ७ मार्चपासून नागपूर जिल्ह्यात सुरू होणार आहे.
मंडळनिहाय या शिबिराची प्रचार-प्रसिद्धी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. मार्च महिन्यात ७ मार्च आणि १४ मार्च या दोन टप्प्यात या शिबिराची तयारी केली जाणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्याची तयारी पूर्ण झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यानंतर १० एप्रिल आणि १७ एप्रिल रोजी पुढील टप्प्यात शिबिरे आयोजित केली जातील. तर ८ मे आणि १५ मे रोजी शहरी भागात विशेष शिबिरे घेण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये नागरिकांचे प्रलंबित फेरफार, अभिलेख दुरुस्ती आणि इतर महसूल संबंधित प्रकरणे निकाली काढली जाणार आहेत. सोबतच नागरिकांच्या तक्रारी स्वीकारून एका महिन्याच्या आत त्याचा निपटारा करण्याचेही प्रशासनाने निश्चित केले आहे.

नागपूर जिल्ह्यात आरोग्य आणि प्रशासनाच्या सेवांचा लाभ नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हे दोन महत्त्वाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. एचपीव्ही लसीकरणामुळे मुलींचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे, तर महसूल शिबिरांमुळे नागरिकांची प्रलंबित कामे जलदगतीने निकाली निघण्याची अपेक्षा आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button