राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; ३० जूनपूर्वी कर्जमाफीची ऐतिहासिक घोषणा होणार

राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून राज्य सरकार लवकरच शेतकरी कर्जमाफीबाबत मोठा निर्णय घेणार आहे. येत्या ३० जूनपूर्वी कर्जमाफीची ऐतिहासिक घोषणा केली जाईल, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत दिली.
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना कृषीमंत्री भरणे यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली आहे. ही समिती राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांची अचूक संख्या, कर्जाचे स्वरूप, बँकांचा सहभाग तसेच कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर होणारा आर्थिक भार याचा सखोल अभ्यास करत आहे.
समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सरकारकडे सादर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सरकारकडून कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील बळीराजाच्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



