सोलापूर जिल्ह्यात धक्कादायक घटना: मोबाईल न दिल्याने १३ वर्षीय मुलाची आत्महत्या

सोलापूर जिल्ह्यातील पेनुर (ता. मोहोळ) येथे १३ वर्षीय मुलाने मोबाईल वापरण्यास नकार दिल्याच्या कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ही घटना १ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घडली. यशराज धर्मराज डोके असे मृत मुलाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धर्मराज डोके हे कुटुंबासह पेनुर येथे शेती करून उपजीविका करतात. घटनेच्या दिवशी सायंकाळी यशराजने मोबाईल वापरण्याचा आग्रह धरला होता. मात्र पालकांनी मोबाईल देण्यास नकार दिल्याने तो रागाच्या भरात घरातील खोलीत गेला. काही वेळानंतर त्याने साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले.
दरम्यान, बराच वेळ दरवाजा आतून बंद असल्याने कुटुंबीयांना संशय आला. हाक मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी लोखंडी रॉडच्या साहाय्याने दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी यशराज गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. कुटुंबीयांनी त्याला तात्काळ पेनुर येथील खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अल्पवयीन मुलाच्या या टोकाच्या निर्णयामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



