अंबादेवीची २५० वर्षांची नवसाची होळीची परंपरा

होळी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण असून यंदा सोमवारी २ मार्च रोजी संपूर्ण देशभर होळी साजरी होत आहे. अमरावतीतील अंबादेवी संस्थानची नवसाची होळी ही तब्बल दोनशे ते अडीचशे वर्षांची परंपरा जपत आजही भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र बनली आहे. या होळी दहन सोहळ्याची आणि रंगपंचमीच्या दिवशीच्या मंदिर व्यवस्थेची सविस्तर माहिती पाहूया या रिपोर्टमधून…
अमरावती शहरातील अंबादेवी संस्थानमध्ये होळीचा सण अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो. या ठिकाणी होळीच्या तब्बल एक महिना अगोदर एक विशेष वृक्ष उभारण्यात येतो. या वृक्षाची दररोज पूजा अर्चना केली जाते. भाविक या वृक्षाला नारळ बांधून नवस मागतात. नवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा येथे येऊन पूजा करण्याची परंपरा आहे. त्यामुळे या होळीला “नवसाची होळी” म्हणून ओळखले जाते.
सोमवारी सायंकाळी नेमक्या ६ वाजता विधिवत होळी दहन करण्यात येणार आहे. यासाठी शहरासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक अंबादेवी संस्थानमध्ये दाखल होत आहेत. दरम्यान, मंगळवार ३ मार्च रोजी रंगपंचमीच्या दिवशी ग्रहण असल्यामुळे मंदिर दुपारी २ वाजेपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शुद्धीकरण व विधिवत पूजा करून मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात येईल, अशी माहिती मंदिर संस्थानच्या सचिवांनी दिली आहे.
अशा प्रकारे श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा संगम असलेली अंबादेवीची नवसाची होळी अमरावतीकरांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.



