Crime NewsLatest NewsMaharashtra

पनवेल रेल्वे स्थानकात माणुसकीला काळीमा – अपंग चिमुकलीला प्लॅटफॉर्मवर सोडून पालक फरार

पनवेल रेल्वे स्थानक परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. अंदाजे तीन ते चार वर्षांच्या एका अपंग चिमुकलीला तिच्याच पालकाने रेल्वे स्थानकात एकटीच सोडून दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

ही घटना पनवेल रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर घडली. कर्तव्यावर असलेल्या होमगार्ड जवानाला अचानक एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने पाहणी केली असता एक चिमुकली मुलगी एकटीच घाबरलेल्या अवस्थेत रडताना आढळून आली. तिच्या अंगात निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि ब्राऊन रंगाची फुल नाईट पॅन्ट होती. मात्र तिच्यासोबत कुठलाही पालक किंवा नातेवाईक उपस्थित नव्हता.

होमगार्ड जवानाने तात्काळ परिसरात चौकशी करत पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बराच वेळ शोध घेऊनही कोणीही पुढे आले नाही. मुलीची विचारपूस केली असता तिने केवळ आपले नाव ‘शिवानी’ असल्याचे सांगितले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता तिला सुरक्षिततेच्या दृष्टीने पनवेल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

रेल्वे पोलिसांनी घटनेची तात्काळ दखल घेत स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासादरम्यान पालकाने आपल्या अपंग मुलीला प्लॅटफॉर्मवर सोडून देत निघून गेल्याचे स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या अमानुष कृत्याप्रकरणी संबंधित पालकांविरोधात पनवेल रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून अशा पालकांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button