AmravatiCrime NewsLatest News

2 दुचाकी चोरट्यांवर कारवाई, 2 दुचाकी जप्त

अमरावती शहरात दुचाकी चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखा अमरावती शहरच्या पथकाने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये दोन दुचाकी चोरट्यांना अटक करत दोन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे शहरातील वाहनचोरी प्रकरणांना मोठा धक्का बसला आहे.

पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी अमरावती शहर आयुक्तालय हद्दीत वाढत्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली. पहिल्या प्रकरणात, पोलीस स्टेशन वलगाव येथे दाखल दुचाकी चोरीचा गुन्हा तपासात असताना, २२ जानेवारी रोजी गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की चांदूर रेल्वे रोडवरील वुड्स वॉटर पार्कच्या पुढील टर्निंग पॉईंटजवळ एक संशयित इसम चोरीची दुचाकी घेऊन उभा आहे. त्यावरून पथकाने सापळा रचून आशिष देवेन्द्र मकेश्वर, वय ३५, रा. मिलिंद नगर, चांदूर रेल्वे, जि. अमरावती याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने वलगाव ते अचलपूर रोडवरील शेतातून होंडा डीम युगा मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून काळ्या रंगाची, विना नंबर प्लेटची होंडा डीम युगा १०० सीसी दुचाकी जप्त करण्यात आली असून हा गुन्हा पूर्णतः उघडकीस आला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला पोलीस स्टेशन वलगाव यांच्या ताब्यात देण्यात आले. तर दुसऱ्या प्रकरणात, पोलीस स्टेशन फेजरपुरा येथे दाखल दुचाकी चोरीचा तपास सुरू असताना, गुन्हे शाखेला मालटेकडी परिसरात चोरीची दुचाकी घेऊन एक इसम उभा असल्याची माहिती मिळाली. त्यावरून छगन राहुल पांडे, वय ३५, रा. यशोदानगर याला ताब्यात घेण्यात आले. त्याने २० जानेवारी २०२६ रोजी काँग्रेसनगर रोडवरील घरातून अॅक्टीव्हा दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून पांढऱ्या रंगाची थ्री-जी अॅक्टीव्हा दुचाकी जप्त करण्यात आली. या प्रकरणातील गुन्हाही पूर्णतः उघडकीस आला आहे. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण अंदाजे १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button