वंचित बहुजन आघाडी–युनायटेड रिपब्लिकन फ्रंटकडून उमेदवारांची घोषणा; काँग्रेसला मोठा धक्का

अमरावती
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि युनायटेड रिपब्लिकन फ्रंट (यूआरएफ) यांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या पत्रकार परिषदेला युनायटेड रिपब्लिकन फ्रंटचे नेते डॉ. अलीम पटेल, वंचित बहुजन आघाडीचे नेते राहुल मेश्राम, माजी महापौर वंदना कंगाले तसेच माजी नगरसेविका पूजा शिंदे उपस्थित होत्या.
यावेळी माजी महापौर वंदना कंगाले यांनी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर गंभीर आरोप करत वंचित बहुजन आघाडी आणि यूआरएफसोबत निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला. काँग्रेसने आपल्याला वारंवार डावलल्याचा आरोप करत, “काँग्रेसचे नेते केवळ कार्यकर्त्यांचा वापर करून घेतात, मात्र त्यांना न्याय देत नाहीत,” असा घणाघाती हल्ला त्यांनी केला.
याचवेळी माजी नगरसेविका पूजा शिंदे यांनीही वंचित बहुजन आघाडी आणि युनायटेड रिपब्लिकन फ्रंटसोबत निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा केली.
महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात असून, वंचित बहुजन आघाडी आणि युनायटेड रिपब्लिकन फ्रंटची ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. या घडामोडींमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून, पुढील राजकीय हालचालींकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे.



