नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कोर्टा गावाचा व्यसनमुक्तीचा संकल्प

यवतमाळ
नववर्षाचे स्वागत म्हणजे केवळ जल्लोष नसून समाजासाठी सकारात्मक संकल्पही असू शकतो, हे यवतमाळ जिल्ह्यातील कोर्टा गावाने कृतीतून दाखवून दिले आहे. गावात वाढत असलेल्या दारू, मटण पार्ट्यांसारख्या व्यसनांमुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याच्या पार्श्वभूमीवर, ग्रामस्थांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यसनमुक्तीचा ठाम संदेश देत प्रभात फेरीचे आयोजन केले.
या उपक्रमाची सुरुवात पहाटे ग्रामसफाईने करण्यात आली. त्यानंतर भजन-कीर्तनाच्या गजरात गावातून भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीत व्यसनमुक्ती, सदाचार, सामाजिक सलोखा आणि सुसंस्कृत जीवनशैली याबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमाचे नेतृत्व गावातील भजन-कीर्तन देवस्थान मंडळी, श्रीकांत जांबुवंतराव खरवडे व त्यांच्या सहकारी ग्रामस्थांनी केले. यावेळी महाराष्ट्र पुरस्कृत व्यसनमुक्ती सम्राट हभप मधुकर खोडे महाराज यांचे पुतणे हभप पवन महाराज खोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. “कोर्टा गावाने उचललेला हा आदर्श इतर गावांनीही घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी अनेक ग्रामस्थांनी दारू व इतर व्यसनांपासून कायमची दूर राहण्याचा संकल्प केला. तसेच काही ग्रामस्थांनी मांस व मच्छी सेवन टाळण्याचा निर्धार करत खोडे गुरुंच्या हस्ते तुळशी माळ धारण केली.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी समाजाला सकारात्मक दिशा देणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरत असून, कोर्टा गावाने सामाजिक जबाबदारीचे एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे.



