बडनेऱ्यातील खळबळजनक हत्या प्रकरणाचा काही तासांत उलगडा; क्रिकेट वाद आणि व्हिडिओ व्हायरलची धमकी ठरली कारण

बडनेरा परिसरात खळबळ उडवणाऱ्या १९ वर्षीय युवकाच्या निर्घृण हत्या प्रकरणाचा अवघ्या काही तासांत उलगडा करण्यात अमरावती क्राइम ब्रांचला मोठे यश मिळाले आहे. मृतक कृणाल विनोद तेलमोरे याची हत्या पाच महिन्यांपूर्वी झालेल्या क्रिकेटमधील वादातून तसेच सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीमुळे करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.
झुडपात बांधून ठेवलेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ
बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील रेल्वे स्टेशन परिसरातील मोकळ्या मैदानात झुडपांमध्ये एक बांधून ठेवलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मृतकाची ओळख माता फैल परिसरात राहणारा १९ वर्षीय कृणाल विनोद तेलमोरे अशी पटली.
घटनेची माहिती मिळताच अमरावती क्राइम ब्रांचने तपासाची सूत्रे हाती घेतली आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
क्रिकेटमधील वादातून वाढला राग
तपासादरम्यान उघड झाले की, आरोपी दीपेश लक्ष्मण समुद्रो आणि मृतक कृणाल यांच्यात सुमारे पाच महिन्यांपूर्वी क्रिकेट खेळताना वाद झाला होता. या वादात पीयूष किशोर भोयर हा देखील सहभागी होता. हा वाद पुढे वैयक्तिक शत्रुत्वात रूपांतरित झाला.
व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीमुळे कट
तसेच काही महिन्यांपूर्वी दीपेश समुद्रो यांच्या काकाच्या मुलाच्या विवाहप्रसंगी साहिल लॉनमध्ये राघव बख्शी याच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याचा व्हिडिओ कृणाल तेलमोरे याने शूट केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची कृणालकडून सातत्याने धमकी दिली जात असल्याने आरोपी त्रस्त झाले होते.
याच कारणातून आरोपींनी संगनमत करून कृणालचा काटा काढण्याचा कट रचल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
चार आरोपींची अटक, दोघे अल्पवयीन
या प्रकरणात
- दीपेश लक्ष्मण समुद्रो
- पीयूष किशोर भोयर
- तसेच दोन अल्पवयीन आरोपी
यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही क्राइम ब्रांचच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे अवघ्या काही तासांत आरोपींना अटक करण्यात आली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई
ही कारवाई शहर पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, शाम घुगे, रमेश धूमाल, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बचाते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
क्राइम ब्रांचचे वरिष्ठ अधिकारी संदीप चव्हाण यांच्या नियोजनात संपूर्ण तपास यशस्वीरीत्या पार पडला.
परिसरात भीतीचे वातावरण
क्रिकेटच्या किरकोळ वादातून सुरू झालेला राग थेट हत्येपर्यंत गेल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, अमरावती क्राइम ब्रांचच्या तत्परतेमुळे आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात आले. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.



