AmravatiLatest News

जिल्ह्याच्या विकासासाठी पायाभूत सुविधा उभाराव्यात – जिल्हाधिकारी आशिष येरेकरजिल्ह्यातील पर्यटन वाढविण्यावर भर

अमरावती, दि. 16 डिसेंबर: जिल्ह्यातील चिखलदरा हे महत्वाचे पर्यटनस्थळ असून, प्रामुख्याने नैसर्गिक सौंदर्य आणि वन्य प्राणी पाहण्यासाठी जंगल सफारी हे प्रमुख आकर्षण आहे. याठिकाणी विकासात्मक पायाभूत सुविधा उभाराव्यात, तसेच येणाऱ्या पर्यटकांच्या करमणुकीसाठी आवश्यक साधने उपलब्ध करून दिल्यास पर्यटक मुक्कामासाठी थांबतील, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज चिखलदरा पर्यटन आणि पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीने आढावा घेतला गेला. यावेळी विविध विभागांकडून येथे राबविण्यात येणाऱ्या विकासात्मक सुविधांची माहिती घेण्यात आली.

चिखलदरा येथे सिडकोमार्फत स्कायवॉक उभारले जात आहे. अडचणींमुळे काम पूर्ण करण्यासाठी स्कायवॉकच्या मध्यभागी जमिनीतून तात्पुरता पाया उभारला जाणार आहे. याशिवाय गोल रस्त्याचे काम वन विभागाच्या जागेवर समन्वय साधून करण्यात येणार आहे. याठिकाणी निसर्ग पर्यटनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, साहसी खेळाची अकॅडमीही उभारण्यात येणार आहे.

तसेच, कोलकास येथे कोरकू यांच्या जीवनावर आधारित केंद्र उभारण्यात येणार आहे. पर्यटक याठिकाणी थांबण्यासाठी लाईट इफेक्ट गार्डन उभारण्याची सूचना देण्यात आली असून, वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. गाविलगड किल्ल्याचा विकास पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार करावा, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

मधाचे गाव म्हणून विकसित होणाऱ्या आमझरी येथे प्रशिक्षण आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय मेळघाटातील 22 गावांमध्ये वीज पोहोचविण्यासाठी वन विभागाच्या सर्व परवानग्या घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पीएम मित्रा पार्कमध्ये विज उपकेंद्र उभारण्यासाठी जागा उपलब्ध होणार असून त्यानुसार नियोजन करण्यात येणार आहे.

शेवटी, मोर्शी आणि वरूड भागासाठी संत्रा प्रक्रिया उद्योग चालना देण्यात येणार असून, येथे कार्यरत जैन आणि एमकेसी यांच्यासोबत समन्वय राखण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button