Amaravti GraminBuldhanaLatest News

बुलढाणा जिल्हा स्त्री रुग्णालयातील गंभीर परिस्थितीसुवार–भटक्या कुत्र्यांचा उच्छाद, रुग्णांच्या सुरक्षेला धोका

बुलढाणा जिल्हा स्त्री रुग्णालयात रुग्णांना उपचाराऐवजी धोका आणि त्रासाचा सामना करावा लागत आहे. ज्या ठिकाणी गर्भवती महिला, नवमाता आणि नवजात बालकांना सुरक्षितता मिळायला हवी, त्याच रुग्णालयाच्या आवारात सुवार आणि भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णालयाच्या सुरक्षेवर आणि स्वच्छतेवर थेट प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून रुग्णालय परिसरात हे प्राणी मुक्तपणे फिरत असल्यामुळे रुग्ण, नवमाता आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषत: रुग्णालयाच्या जेवणगृहाजवळ हे प्राणी सतत फिरताना दिसतात. रुग्ण जेवत असताना हे प्राणी अगदी जवळ येत असल्याने संसर्गजन्य रोग पसरण्याची गंभीर भीती व्यक्त होत आहे. रुग्णालय व्यवस्थापन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत असून, निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

याहूनही चिंतेची बाब म्हणजे रुग्णांसाठी असलेल्या झोपण्याच्या रूममध्ये पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. हात धुणे, स्वच्छता राखणे आणि नवजात बालकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रुग्ण व नातेवाईकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

हे स्त्री रुग्णालय असल्याने येथे गर्भवती महिला, माता आणि लहान बाळे राहतात. भटक्या प्राण्यांचा धोका, अस्वच्छ वातावरण आणि पाण्याचा अभाव या तिहेरी समस्येमुळे नागरिक आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

नागरिकांनी तातडीने प्रशासनाने हस्तक्षेप करून रुग्णालय परिसरातील प्राणी हटवावेत, रुग्णालयात स्वच्छतेची मोहीम राबवावी, तसेच झोपण्याच्या रूममध्ये पाण्याची तात्काळ व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.

रुग्णालय प्रशासनाने या गंभीर तक्रारीची तातडीने दखल घेऊन योग्य उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे, अन्यथा रुग्णांचे आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर होत जाणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button