अंबरनाथ : जिल्हा परिषद शाळेत ‘लेट्स कनेक्ट द वर्ल्ड’ उपक्रम; विद्यार्थ्यांसाठी जर्मन भाषेच्या शिक्षणाची सुरुवात

ठाणे – ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील कान्होर इंदगाव केंद्र येथील जिल्हा परिषद शाळेने विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर संवाद कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्याची सुरुवात केली आहे. ‘लेट्स कनेक्ट द वर्ल्ड थ्रू जर्मन लँग्वेज’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे प्राथमिक शिक्षण दिले जात आहे.
आजच्या स्पर्धात्मक आणि जागतिकीकरणाच्या युगात विद्यार्थ्यांनी विविध देशांच्या भाषा, संस्कृती आणि जीवनशैली यांचा परिचय करून घेणे गरजेचे ठरत आहे. अशा काळात पारंपरिक शिक्षणपद्धतीच्या पलीकडे जाऊन, या जिल्हा परिषद शाळेने विद्यार्थ्यांना परदेशी भाषेची ओळख करून देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
सामान्यतः जिल्हा परिषद शाळांमध्ये परदेशी भाषा शिकविल्या जात नाहीत. मात्र, शाळेचे मुख्याध्यापक अमोल पेन्सलवार यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे आता विद्यार्थी मराठी, हिंदी, इंग्रजीसोबत जर्मन भाषेतही प्राथमिक संवाद साधू लागले आहेत.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय संवाद क्षमतेत वाढ तर करेलच, पण त्यांना विविध संस्कृती समजून घेण्याची आणि नव्या ज्ञानाचे दरवाजे उघडण्याची संधीही मिळणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आशादायक ठरत असून, भविष्यात अशा उपक्रमांचे अन्य शाळांमध्येही अनुकरण व्हावे, अशी अपेक्षा शिक्षणवर्तुळातून व्यक्त केली जात आहे.



