BJP vs राऊत: जय शहा यांच्या यशावरून वादाच्या फैरी

भारताने पाकिस्तानला पराभूत करत आशिया चषक स्पर्धा जिंकल्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याच्या हातून चषक स्वीकारण्यास नकार दिला. यावरुन खासदार संजय राऊत यांनी भारतीय कर्णधार सुर्यकुमार यादववर निशाणा साधल्यानंतर आता महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीने राऊतांना कठोर शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे. सुर्यकुमारची पाठराखण करत कठोर शब्दांमध्ये भाजपाने राऊतांना सुनालं आहे.
राऊत काय म्हणाले?
भारताने ट्रॉफी न स्वीकारल्याच्या प्रकरणाची चर्चा असतानाच खासदार संजय राऊत सुर्यकुमार यादवरवरच संतापले असून भारतीय जनतेला भारतीय संघाने मूर्खात काढल्याचं म्हटलं आहे. राऊतांनी आशिया चषकाची ट्रॉफी जेव्हा पहिल्यांदा समोर आणण्यात आली त्यावेळी आठ संघांचे कर्णधार एकत्र आलेले तेव्हाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावेळी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष असलेल्या नक्वींसोबत सुर्यकुमारने हस्तांदोलन केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. याच व्हिडीओवरुन राऊतांनी सगळे वरपासून खालीपर्यंत नाटकं करत असल्याचा टोला लगावला आहे.
“मालिकेच्या सुरुवातीला, 15 दिवसांपूर्वी त्याने पाकिस्तानी मंत्री मोहसीन नक्वी यांच्याशी हस्तांदोलन केले आणि फोटो काढला. आता हे लोक देशासाठी एक शो करत आहेत! जर तुमच्या रक्तात इतकी देशभक्ती असती तर तुम्ही पाकिस्तानसोबत सामन्यात सामील झाले नसते. हे वरपासून खालपर्यंत नाटक आहे,” असं राऊत यांनी पोस्ट करत म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना राऊत यांनी, “भारताची जनता मूर्ख आहे,” असं राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
भाजपाचा राऊतांवर हल्लाबोल
राऊत यांनी केलेल्या या टीकेवरुन भाजपाने खोचक टीका केली आहे. “आशिया कपमध्ये पाकिस्तानचा पराभव केला.तिन्ही सामन्यांत धूळ चारण्याचे काम केले. ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही हे दुबईच्या मैदानात दाखवून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात हा नवा भारत आहे, पाकचे बाप कोण हे संपूर्ण जगाला उत्तर मिळालं आहे,” असं भाजपाचे प्रसारमाध्यम समन्वयक नवनाथ बन यांनी यांनी म्हटलं आहे. “भांडूपमध्ये बसून राऊत बोलत होते, सामना बघितला नाही कोणी! जवळपास 100 कोटी लोकांनी सामना बघितला आहे. खरे देशप्रेमी आम्ही आहोत आणि तुम्ही देशद्रोही आहात हे सिद्ध झालंय,” असंही बन म्हणाले.
‘संजय राऊत हे हरिस रौफ’
“संजय राऊत काल रात्री रडत होते. भारताचा विजय झाल्याने त्यांच्या दांड्या गुल झाल्या आहेत. हारिस रौफ आहेत संजय राऊत! विमान रोज उडतं आणि पडतं. हारिस रौफला कसं उत्तर दिलंय हे दिसलंय. सैनिकांनी जसा जल्लोष केला तसा भारतीयांनी जल्लोष केला. भारताने जगाला दाखवलं आहे भारत काय आहे,” असंही बन यांनी राऊतांवर निशाणा साधताना म्हटलं आहे. वरपासून खालीपर्यंत सगळेजण नाटकं करत आहेत या राऊतांच्या टीकेला उत्तर देताना बन यांनी, “नाटकं संजय राऊत करतात. सट्ट्यात त्यांचे पैसे गेलेत. पाकिस्तानचा तुमचा डीएनए आहे का? हा सवाल आहे,” असंही बन यांनी म्हटलंय.
‘तुम्ही फुटकी कवडीदेखील…’
“धूळ चारण्याचे काम केले, भारत खेळला नसता तर पाकिस्तान विजयी झाला असता. सुर्यकुमारने आपले मानधन भारतीय सैन्यांना दिलंय. संजय राऊतांनी आपलं मानधन दिलंय का? फुटकी कवडी देखील त्यांनी दिली नाही. मानधन तुमचं द्या, फुकट गप्पा मारु नका,” असा सल्ला बन यांनी राऊतांना दिला आहे.
‘जय शाह यांनी आपल्या देशाचे नाव उंचावले’
“संजय राऊत महाराष्ट्र सुज्ञ आहे, तुम्ही मुर्खासारखी बडबड करता. भाजप काय आहे? हे जनतेला माहिती आहे. तीन वेळा सरकार देशात निवडून आलं आहे, सोबतच राज्यात देखील आलंय.तुम्ही वायफळ बडबड करु नका. जय शाह यांनी आपल्या देशाचे नाव उंचावले आहे, मात्र तुम्ही आल्यापासून मविआच्या दांड्या गुल करण्याचे काम करत आहात,” असा टोला बन यांनी लगावला आहे. “उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला आणखी खड्ड्यात घालण्याचे काम करत आहात. बाळासाहेबांचे विचार धुळीला मिळवत आहेत,” असंही बन म्हणालेत.



