आईवर बलात्कार करणाऱ्या कुकर्मी मुलाला जन्मठेप

ही धक्कादायक घटना १९ जुलै २०२१ रोजी वणी परिसरात घडली. पीडित आई आपल्या मुलीला भेटण्यासाठी वणीला आली असता आरोपी राकेश दत्तू काळे याने तिला सलग दोन ते तीन दिवस मारहाण केली आणि धमकावले. २३ जुलै २०२१ च्या रात्री तो दारूच्या नशेत घरी आला आणि पुन्हा मारहाण केली. यावेळी त्याने पीडितेचे तोंड दाबून मारण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. या अमानुष कृत्यामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या आईने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तातडीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि पोलिसांनी गुन्ह्याचा तपास वेगाने सुरू केला. तपासादरम्यान सर्व महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आणि आरोपीविरोधात सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. अभियोक्ता रमेश डी. मोरे यांनी न्यायालयात ८ प्रमुख साक्षीदारांची तपासणी करून प्रकरणाचा निर्वाळा दिला. घटनेच्या तब्बल ४ वर्षानंतर सर्व साक्ष आणि पुरावे ग्राह्य धरून सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या निकालामुळे पीडितेला न्याय मिळाला असून जिल्ह्यात हा निर्णय एक आदर्श ठरेल अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.



