रत्नागिरीपासून अवघ्या 41 किमीवर ‘देवघळी’; निळ्याशार पाण्याचा स्वर्गसुखद किनारा, पर्यटनप्रेमींना मालदिवची आठवण!

रत्नागिरी : कोकणातील अप्रतिम सौंदर्याचा शोध घेत असाल, तर रत्नागिरीपासून अवघ्या ४१.९ किमी अंतरावर असलेलं ‘देवघळी’ हे ठिकाण तुमच्या यादीत असायलाच हवं. सध्या गर्दीपासून दूर, शांत आणि स्वच्छ किनाऱ्याचा अनुभव देणारं हे ठिकाण हळूहळू पर्यटकांच्या पसंतीस उतरू लागलं आहे.
देवघळी – नावातच देवाचं घर
देवघळी हा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी गावाजवळील समुद्रकिनारा आहे. तीन बाजूंनी डोंगरकड्यांनी वेढलेला हा किनारा, अथांग निळाशार पाणी आणि लाटांचा फेसाळणारा आवाज – हे सारं मनाला सच्चा “कोकणवास” देणारं आहे.
इथं गर्दी जवळपास नाहीच, त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात मनसोक्त वेळ घालवण्यासाठी ही एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे.
टेबल व्ह्यू पॉईंटवरून विहंगम दृश्य
देवघळी समुद्रकिनाऱ्याच्या जवळच एका टेकडीवर असलेल्या ‘टेबल व्ह्यू पॉइंट’ वरून संपूर्ण किनारा आणि समुद्राचं विहंगम दृश्य टिपता येतं. हे दृश्य अनेकांचं कॅमेरात नाही, तर आठवणीतच कैद होतं.
कानकादित्य मंदिर – निसर्गासोबत अध्यात्माचाही स्पर्श
देवघळीच्या काही मिनिटांच्या अंतरावर कशेळी गावात ‘कानकादित्य मंदिर’ आहे. हे मंदिर सुमारे ८०० वर्षांपूर्वीचं, आणि सूर्यदेवाला समर्पित आहे. काळ्या पाषाणातील कोरलेली मूर्ती आणि तिचे सोनेरी अलंकार – हे पाहताना इतिहास जिवंत होतो.
देवघळीपर्यंत कसं पोहोचाल?
रस्त्याने – रत्नागिरी शहरापासून ४०-४२ किमी. स्वतःची गाडी, बाईक किंवा कॅब ही सर्वोत्तम पर्याय.
रेल्वेने – जवळचं स्थानक रत्नागिरी किंवा कुडाळ. पुढे टॅक्सी वा बसने प्रवास करता येतो.
खासियत काय?
तीन बाजूंनी डोंगरकड्यांनी वेढलेला शांत किनारा
निळ्याशार स्वच्छ पाणी आणि कमी गर्दी
वाळूवर चालताना लाटांचा नाद
टेबल व्ह्यू पॉइंटवरून फोटोसाठी परफेक्ट लोकेशन
कानकादित्य मंदिरासारखं ऐतिहासिक ठिकाण



