नाशिकमध्ये ट्रकचालकांना लुटणारी टोळी उघडकीस; दोन तरुणींना अटक, तीन आरोपी फरार!

नाशिक : नाशिक शहरात ट्रक चालकांना लुटणाऱ्या एका धक्कादायक टोळीचा पर्दाफाश झाला आहे. विशेष बाब म्हणजे या टोळीत दोन तरुणींनी मुलाचा वेश धारण करून गुन्हे केले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. नाशिकरोड पोलिसांनी केलेल्या जलद कारवाईमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.
ट्रकचालकावर हल्ला आणि लूट
ही घटना पहाटे सुमारे 4 वाजता पुणे रोडवरील गुप्ता हॉस्पिटलसमोर घडली. ट्रकचालक रामनिवास वर्मा यांना अडवून टोळीतील सदस्यांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यांच्या डाव्या हातावर व गळ्यावर वार करत त्यांना जखमी करण्यात आलं. आरोपींनी त्यांच्या खिशातील 5 हजार रुपये आणि स्कॅनरमधून 1 हजार रुपये लंपास केले.
हेल्पलाइनवर कॉल करताच पोलिसांची तातडीने कारवाई
हल्ल्यानंतर रामनिवास वर्मा यांनी 112 या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली. काही मिनिटांतच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी पोहोचलं. आरोपी पळून गेले होते, मात्र पोलिसांनी पाठलाग करत दोन तरुणींना अटक केली.
अटक आरोपींची नावे
अटक करण्यात आलेल्या तरुणींची नावे निकिता आव्हाड आणि कोमल आढाव (रा. जेलरोड, नाशिक) अशी आहेत. या दोघींनी मुलाचा वेश घालून तीन पुरुष मित्रांसोबत टोळी बनवली होती. हल्ल्यानंतर हे पाचही जण एका रिक्षामधून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. अंधाराचा फायदा घेत तीन आरोपी फरार झाले असून, त्यांची नावे प्रेम धाटे, धीरज धाटे, आणि शुभम आहे उर्फ राठोड अशी आहेत.
पोलिसांचा पुढील तपास सुरू
या गुन्ह्याची नोंद नाशिकरोड पोलीस ठाण्यात झाली असून, पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून, या टोळीव्यतिरिक्त आणखी कोणी गुन्ह्यांत सामील आहे का, अशा गुन्हेगारी टोळ्या शहरात सक्रिय आहेत का, याचा सखोल तपास करण्यात येत आहे.
सावध रहा: अशा घटनांमुळे ट्रक चालक आणि अन्य प्रवाशांनी सतर्क राहण्याची गरज आहे. पोलिसांकडून नागरिकांना मदत मिळवण्यासाठी 112 हेल्पलाइन नंबरचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



