अमरावतीत नकली पोलीस बनून महिलेची लूट

अमरावती : शहरात नकली पोलीस बनून सोन्याच्या बांगड्या लंपास करणाऱ्या भामट्यांची धाडसी लूट! अमरावतीत रामपुरी कॅम्प परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका महिलेच्या आयुष्यभराच्या सोन्याच्या बांगड्या क्षणात गायब झाल्या… नकली पोलीस बनून फसवणूक करणाऱ्या या टोळीचा शोध आता गाडगे नगर पोलीस कसून घेत आहेत. अमरावती शहरातील रामपुरी कॅम्प परिसरात आज सकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. सौ. भारती मोहनलाल केवलानी, वय 44, सकाळी साडेसातच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी निघाल्या होत्या.
यावेळी तीन अज्ञात इसमांनी त्यांना अडवत, “आम्ही पोलीस आहोत… समोर खून झालेला आहे, आपण इतके दागिने घालून पुढे जाऊ नका,” असे सांगत महिलेला विश्वासात घेतले. यानंतर आरोपींनी त्या महिलेला समजावून तिच्या हातातील अडीच तोळे सोन्याच्या बांगड्या उतरवून घेतल्या. त्या बांगड्या रुमालात बांधून देत, “हा रुमाल घरी जाऊनच उघडा,” असे सांगून आरोपी पसार झाले. महिला घरी परतल्या, मात्र रुमाल उघडला असता आत काहीही नव्हते. धक्का बसलेल्या महिलेनं पती मोहन केवलानी व कुटुंबियांना घटना सांगितली. आरोपींनी पूर्ण सापळा रचून, अगोदरच एका साथीदाराच्या गळ्यातील चैन काढून ती रुमालात बांधल्याचा बनाव महिलेपुढे केला होता. हा प्रकार पाहून भारतीला खात्री पटली की आरोपी खरोखर पोलीसच आहेत, आणि त्यांनी आपल्या बांगड्या त्यांच्या हाती दिल्या. घटनेची माहिती मिळताच गाडगे नगर पोलीस स्टेशनचे पीएसआय चोपडे घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासले जात आहेत. नकली पोलीस बनून अमरावती शहराच्या मध्यवस्तीतील रामपुरी परिसरात दिवसा ढवळ्या महिलेला लुटणाऱ्या टोळीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस उपायुक्त गणेश शिंदे हे देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. नकली पोलीस बनून महिलांची फसवणूक करणाऱ्या या टोळीचा शोध घेण्यासाठी गाडगे नगर पोलीसांनी मोहीम हाती घेतली आहे. शहरात नकली पोलीस बनून भामटे फसवणूक करत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण आहे. या टोळीचा शोध घेऊन त्यांना पकडणं पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरणार आहे. दरम्यान, महिलांनी व नागरिकांनी रस्त्यावर संशयित इसमांवर सहज विश्वास ठेवू नये, अशीच विनंती पोलिसांकडून करण्यात येत आहे.”



