गोंडबाबा देवस्थानात नागपंचमी उत्सव भक्तिमय वातावरणात-संगीतमय सुंदरकांड आणि भजनांचा भक्तांसाठी आनंदोत्सव

चांगापूर : चांगापूर येथील सुप्रसिद्ध गोंडबाबा देवस्थानात नागपंचमीचा उत्सव मोठ्या भक्तिमय आणि उत्साहात साजरा झाला. यावर्षी उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे १०१ व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम, संगीतमय सुंदरकांड, आणि मध्यरात्री संपन्न झालेला बाबांचा महाभिषेक. हजारो भाविकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन गोंडबाबांचा आशीर्वाद घेतला.
नागपंचमीच्या पूर्वसंध्येपासूनच देवस्थानात भाविकांची गर्दी सुरू झाली होती. जय बाबा ग्रुपतर्फे आयोजित ‘म्युझिकल भजन संध्या’ कार्यक्रमाला भाविकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या भजनांनी संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.
मध्यरात्री मंत्रोच्चाराच्या गजरात गोंडबाबांचा महाभिषेक आणि होम-हवन विधी संपन्न झाला. १०१ व्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष पूजा-अर्चा करण्यात आली, ज्यामुळे यावर्षीच्या उत्सवाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते.
चांगापूर मित्र मंडळाने आयोजित केलेल्या संगीतमय सुंदरकांड पठणाने भक्तांना एक आगळावेगळा आनंद दिला. सुंदरकांडातील दोहे आणि चौपायांनी देवस्थानाचा परिसर दुमदुमून गेला होता.
भक्तांसाठी विशेष सोयी आणि महाप्रसादाचे वाटप
उत्सवासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मोफत बससेवेची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे दूरवरून आलेल्या भक्तांना मोठा दिलासा मिळाला. सायंकाळी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यात हजारो भाविकांनी सहभाग घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. देवस्थानातील विश्वस्त मंडळाने ‘सिटी न्यूज’ला दिलेल्या विशेष प्रतिक्रियांमध्ये, यंदाच्या उत्सवाला भक्तांचा मिळालेला भरभरून प्रतिसाद पाहून समाधान व्यक्त केले.
भक्तांच्या उत्साहामुळे आणि स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमामुळे गोंडबाबा देवस्थानातील नागपंचमी उत्सव यशस्वीरित्या आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.



