Latest News

“राज ठाकरेंसोबत गेलेला संपणार, ते राजकारणाच्या कचराकुंडीत गेले,” मनोज तिवारींचा घणाघात

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल मीरा भाईंदर येथे सभा पार पडली. मीरा भाईंदर येथे त्यांनी मराठी नागरिकांना सर्वांशी मराठीतच संवाद करण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी राज ठाकरे यांनी मीरा रोड येथे एका व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणीवरी प्रतिक्रिया दिली. मराठी भाषा कानावर समजणार नसेल तर कानाखाली बसेलच, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. तसेच मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा प्रयत्न आहे. मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. मीरा भाईंदर पासून पालघरपर्यंतचे मतदारसंघ अमराठी नागरिकांचा करायचा डाव आहे, असा आरोपदेखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या सभेत केला. त्यांच्या भाषणावर आता विविध नेतेमंडळींकडून प्रतिक्रिया दिली जात आहे. भाजप नेते मनोज तिवारी यांनी याबाबत तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

“राज ठाकरेंच्या प्रवृत्तीला समजा. राज ठाकरेंचा हिंदी विरोध आणि मराठी प्रेम हे सगळं सिझनल आहे. जेव्हा निवडणूक येते तेव्हा हे लोकं असं करतात. राज ठाकरेंना महाराष्ट्राची जनताच शिक्षा देते. राज ठाकरेंचा मनसे पक्ष किती वर्षांपासून आहे? त्यांनी सुरुवातीला अशा चांगल्या गोष्टी सांगितल्या की, त्यांचे 13 आमदार निवडून आले. त्यानंतर या लोकांनी एकदा उत्तर भारतीयांवर आणि हिंदी भाषिकांवर हल्ला करणं सुरु केलं”, असं मनोज तिवारी म्हणाले.

“माझ्या घरावर सुद्धा हल्ला झाला होता. तेव्हा आम्ही रस्त्यावर आलो होतो आणि आम्ही सांगितलं होतं की, महाराष्ट्राची जनताच, मराठी माणूसच राज ठाकरे सारख्या प्रवृत्तीला शिक्षा देईल. त्यामुळे 13 आमदारांवरुन एका आमदारावर आले. ते सुद्धा भाजपात गेले. राज ठाकरे या देशाची आणि महाराष्ट्राची प्रांतीय रचना, भाषिक एकात्मकता, एकात्मतेला तोडणारा प्राणी आहे”, अशी टीका मनोज तिवारी यांनी केली.

“त्यामुळे राज ठाकरेंना ज्यांना जे बोलायचं ते बोलावं पण एक लक्षात घ्यावं, ही व्यक्ती राजकारण्याच्या कचराकुंडीत गेली आहे तिला जिवंत करण्याचा प्रयत्न कोणत्याही टीकेने होऊ नये, अशी मी प्रार्थना करते. राज ठाकरेंना महाराष्ट्राची जनता कुठेच बसवत नाही. जो राज ठाकरे यांच्यासोबत जाणार तो सुद्धा समाप्त होणार. कारण महाराष्ट्र, महाराष्ट्रीयन, मराठी भाषा, तिच्या अस्मितेचं भारतीय जनता पक्ष जेवढं पालन करतो तेवढं कुणीही मराठी संस्कृतीचं पालन करु शकत नाही. राज ठाकरे सारखी लोकं मराठी संस्तृतीचा अनादर करत आहेत”, असा घणाघात मनोज तिवारी यांनी केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button