“राज ठाकरे मीरा रोड भेट – मराठी अस्मितेला राष्ट्रीय व्यासपीठ”

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मीरा-भाईंदर शहर चर्चेला कारण ठरत आहे. त्यामागे कारण देखील तसंच आहे. महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत मराठी आणि अमराठी असा वाद उफाळला आहे. मीरा रोड येथील एका व्यापाऱ्याला मराठीच्या मुद्द्यावरुन मनसे च्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. महाराष्ट्रात राहायचं असेल आणि व्यवसाय करायचा असेल तर मराठी बोलणं अनिवार्य असल्याची भूमिका मनसेची आहे. मनसेच्या या भूमिकेवर काही अमराठी नागरिकांनी आक्षेप घेतला. एका उद्योगपतीने तर थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मराठी बोलणार नाही, असं चॅलेंज दिलं होतं. यावरुन मोठा वाद उफाळल्यानंतर या उद्योगपतीने राज ठाकरे यांची जाहीरपणे माफी मागितली होती. दुसरीकडे मीरा भाईंदरमध्ये मोठा राडा झालेला बघायला मिळाला.
मीरा भाईंदरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्याला मारहाण केल्यानंतर तिथल्या व्यापाऱ्यांनी या घटनेवर आक्षेप घेतला. मीरा रोड येथील व्यापाऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्याला पाठिंबा देण्यासाठी शहरात बंद पाळला. एवढंच नाही तर व्यापाऱ्यांनी मोठा मोर्चा देखील शहरात काढला. या मोर्चामुळे हिंदी आणि मराठी भाषिक असा वाद पुन्हा पेटला. या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मनसे, शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्याकडून एकत्रित मोर्चा काढण्याचा निर्णय झाला. पण या मोर्चाला पोलिसांनी मज्जाव केला. विशेष म्हणजे संभाव्य परिस्थितीचा धोका लक्षात घेता पोलिसांनी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली.
अखेर या प्रकरणावरुन मनसे, ठाकरे गट आणि महाराष्ट्र एकीकरण समिती प्रचंड आक्रमक झाले. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यामुळे मोठ्या नाट्यमय घडामोडींनंतर मनसेच्या मोर्चाला परवानगी मिळाली. हा मोर्चा 8 जुलैला निघाला होता. या मोर्चानंतर रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत आपल्या पक्षाच्या नेत्यांना महत्त्वाचा आदेश दिला होता. आपल्या परवानगीशिवाय मीडियाशी बोलू नका किंवा समाज माध्यमांवर प्रतिक्रिया देऊ नका, असा आदेश राज ठाकरे यांनी दिला.
यानंतर आता राज ठाकरे हे स्वत: मीरा रोडच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. या दौऱ्यात राज ठाकरे नेमकी कुणाची भेट घेणार, नागरिकांना संबोधित करणार का? राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे येत्या 18 जुलैला मीरा रोडच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागणार आहे.



