खाप्यात भरधाव पिकअपने दुचाकीला उडवले; हिट अँड रनचा थरार! दुचाकीस्वार गंभीर जखमी, १५ वर्षीय मुलगा थोडक्यात बचावला

आनंदसागर बारजवळ २७ नोव्हेंबर रोजी दुपारी भीषण अपघात; धडक देऊन चालक फरार, खापा पोलिसांनी पिकअप वाहन पकडले; हितज्योती आधार फाउंडेशनकडून जखमीला तातडीने मदत
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिट अँड रनची घटना समोर आली आहे. आनंदसागर बारजवळ भरधाव पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या दुचाकीवर १५ वर्षांचा मुलगाही होता. सुदैवाने या अपघातात त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. धडक दिल्यानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून पसार झाला; मात्र खापा पोलिसांनी तत्परता दाखवत अपघातग्रस्त पिकअप वाहनाचा शोध घेऊन ते पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे एक वाजताच्या सुमारास आनंदसागर बारजवळ हा अपघात घडला. भूषण घायवट (रा. कोच्ची, खापा) हे आपल्या मित्राच्या भाजीपाला दुकानासाठी विजेची बॅटरी आणून देण्यासाठी दुचाकीने जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीवर १५ वर्षीय मुलगाही सोबत होता. दरम्यान, भरधाव वेगाने आलेल्या पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत भूषण घायवट गंभीर जखमी झाले, तर सोबत असलेला मुलगा सुदैवाने बचावला.
अपघातानंतर पिकअप चालकाने जखमींना मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती इमरान यांनी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना दिली. बनसोड यांनी तातडीने खापा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांच्याशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच खापा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील कार्यवाही सुरू केली.
दरम्यान, जखमी भूषण घायवट यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी हितज्योती आधार फाउंडेशनच्या पथकाने पुढाकार घेतला. फाउंडेशनच्या टीमने त्यांना सावनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) हलविण्यात आले.
दुसरीकडे, अपघात घडवून पसार झालेल्या पिकअप वाहनाचा खापा पोलिसांनी शोध घेऊन ते ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात वाहनचालकाविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती आहे.



