वाळू वाहतुकीसाठी दरमहा ४० हजारांची लाच! शिर्डी पोलीस ठाण्यातील हवालदार एसीबीच्या जाळ्यात; रंगेहात अटक

कोपरगाव तालुक्यातील देर्डे फाटा येथे नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू वाहतुकीला अडथळा न आणण्यासाठी केली होती पैशांची मागणी, पोलीस दलात खळबळ
अहिल्यानगर : अवैध वाळू वाहतुकीला अभय देण्यासाठी दरमहा ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे. नाशिक येथील एसीबीच्या पथकाने कोपरगाव तालुक्यातील देर्डे फाटा येथे सापळा रचून ही कारवाई केली. अशोक शिंदे असे कारवाई करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव असून, तो शिर्डी पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाळू वाहतुकीदरम्यान कोणताही अडथळा निर्माण करू नये आणि वाहतूक सुरळीत सुरू ठेवावी, यासाठी संबंधित व्यक्तीकडे पोलीस हवालदार अशोक शिंदे याने दरमहा ४० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. या लाच मागणीला कंटाळून संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर नाशिक एसीबीच्या पथकाने कोपरगाव तालुक्यातील देर्डे फाटा परिसरात सापळा रचला. यावेळी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना हवालदार अशोक शिंदे याला पथकाने रंगेहात पकडले.
पोलीस विभागातील कर्मचाऱ्याकडूनच अशा प्रकारे लाचेची मागणी झाल्याचे उघडकीस आल्याने पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणात एसीबीकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, लाच मागणीमागील इतर बाबींचाही तपास केला जात आहे.



