नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची कोणतीही चर्चा नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट वक्तव्य

सुनेत्रा पवार यांच्यासोबतच्या बैठकीत केवळ शासकीय कामकाजावर चर्चा; विलीनीकरणाच्या बातम्या केवळ माध्यमांमध्येच – फडणवीस
नागपूर प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. सुनेत्रा पवार या शासकीय कामकाजाच्या संदर्भात भेटायला आल्या होत्या. या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. सध्या विलीनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा सुरू नसून, या विषयावर माध्यमांमध्येच वेगवेगळ्या चर्चा आणि तर्कवितर्क सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.
नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सुनेत्राताई शासकीय कामकाजानिमित्त आमच्याकडे आल्या होत्या. आमच्यात कुठेही विलीनीकरणाची चर्चा झाली नाही. विलीनीकरणासंदर्भात काही चर्चा असती, तर त्यांनी आमच्याशी नक्कीच चर्चा केली असती. कारण आम्ही सत्तेत आहोत. मात्र, आजच्या बैठकीत अशा प्रकारचा कोणताही विषय चर्चेला आला नाही.
विलीनीकरणाच्या चर्चांबाबत अधिक स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले की, सध्या विलीनीकरणाची कोणतीही चर्चा सुरू नाही. संबंधितांकडून अशी चर्चा सुरू असल्याचे आम्हाला सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे माध्यमांमध्ये सुरू असलेल्या तर्कवितर्कांवर भाष्य करणे योग्य ठरणार नाही.
दरम्यान, महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेचाही उल्लेख केला. सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत डिलिमिटेशन विधेयकाला समर्थन असल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वीच्या विधेयकाप्रमाणे लोकसभेच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष त्याला पूर्ण समर्थन देईल, अशी भूमिका त्यांनी मांडल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या विविध चर्चांवर भाष्य करताना, केवळ अंदाज आणि तर्कवितर्कांच्या आधारे बातम्या पसरवू नयेत, असे सूचित करत फडणवीस यांनी या चर्चांना ‘पतंगबाजी’ असे संबोधले. अशा प्रकारची पतंगबाजी आता थांबली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
BYTE : देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र



