परतवाड्यातील ‘डॉली’ वाघिणीची आता गोरेवाडा झूमध्ये रवानगी होणार?

आठ महिन्यांपासून ट्रान्झिट केअर युनिटमध्ये मुक्काम; जंगलात सोडणे धोकादायक ठरण्याची शक्यता, वन्यजीव वार्डन राकेश महल्ले यांची सिटी न्यूजला विशेष मुलाखत
अमरावती : गेल्या आठ महिन्यांपासून परतवाडा येथील ट्रान्झिट केअर युनिटमध्ये असलेल्या ‘डॉली’ नावाच्या वाघिणीच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता चर्चेत आला आहे. या वाघिणीला मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगलात सोडण्याऐवजी नागपूर येथील गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात हलविण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती वन्यजीव वार्डन राकेश महल्ले यांनी सिटी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली. डॉलीची प्रकृती, तिचे वर्तन आणि जंगलात राहण्याची क्षमता यांचा अभ्यास केल्यानंतरच तिच्या पुढील व्यवस्थेबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राकेश महल्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉली ही वाघीण मूळची चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी परिसरातून आणण्यात आली आहे. विशेष म्हणजे, डॉलीच्या आईने यापूर्वी चार महिलांची शिकार केल्याची माहिती आहे. डॉलीच्याही वर्तनाबाबत गंभीर बाबी समोर आल्याने तिला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे तिच्या पुनर्वसनासाठी सुरक्षित पर्यायांचा विचार सुरू आहे.
मेळघाटऐवजी गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचा पर्याय!
डॉलीला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात सोडण्याऐवजी नागपूर येथील गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात ठेवण्याचा पर्याय पुढे आला आहे. मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. डॉली पूर्णपणे तंदुरुस्त झाली आहे का, तिचे वर्तन कसे आहे आणि ती नैसर्गिक वातावरणात राहण्यास सक्षम आहे का, याची सविस्तर माहिती घेतली जात आहे. त्यानंतर वनविभाग आणि संबंधित यंत्रणांकडून पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
मेळघाटात १५० पेक्षा अधिक वाघांची संख्या!
दरम्यान, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वाघांची वाढती संख्या ही आनंदाची बाब असल्याचे राकेश महल्ले यांनी सांगितले. त्यांच्या माहितीनुसार, मेळघाट परिसरात १५० पेक्षा अधिक वाघ असून हा परिसर वाघांच्या अधिवासासाठी अनुकूल आहे. मेळघाटातील जंगल, नैसर्गिक वातावरण आणि वन्यजीवांसाठी उपलब्ध असलेली परिस्थिती वाघांच्या संवर्धनासाठी पोषक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी मेळघाटातील वाघांच्या संवर्धनाबाबत विश्वास व्यक्त करताना, देशातील इतर भागांत वाघांची संख्या कमी झाली तरी मेळघाटातील वाघांचे अस्तित्व टिकून राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
डॉलीच्या पुनर्वसनासाठी सिटी न्यूजचा पुढाकार
गेल्या आठ महिन्यांपासून डॉली परतवाडा येथील ट्रान्झिट केअर युनिटमध्ये आहे. तिचे सुरक्षित पुनर्वसन व्हावे आणि तिच्या भवितव्याबाबत योग्य निर्णय घेतला जावा, यासाठी सिटी न्यूजच्या टीमकडूनही सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. डॉलीला सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या प्रक्रियेला गती मिळावी, यासाठी संबंधित यंत्रणांकडे लक्ष वेधण्यात येत आहे.
आता डॉलीला नागपूरच्या गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात स्थान मिळणार की तिच्यासाठी अन्य पर्याय निवडला जाणार, याकडे वन्यजीवप्रेमींचे लक्ष लागले आहे. मात्र, डॉलीचे सुरक्षित पुनर्वसन आणि नागरिकांची सुरक्षितता या दोन्ही बाबी लक्षात घेऊन वनविभाग कोणता निर्णय घेतो, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.


