कौटुंबिक वादातून सख्ख्या भावानेच भावावर फेकली वीट; उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत!

पत्नीला समजावताना भावाने केला हस्तक्षेप; रागाच्या भरात विटेने हल्ला, जरीपटका पोलिसांत गुन्हा दाखल
नागपूर : कौटुंबिक वादातून सख्ख्या भावानेच आपल्या भावावर विट फेकून हल्ला केल्याची घटना नागपूरच्या जरीपटका परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात तरुणाच्या उजव्या डोळ्याला दुखापत झाली असून, त्याला उपचारासाठी मानकापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. घरगुती वादातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमित सुनील बोहत (वय ३०) असे जखमी तरुणाचे नाव असून, अंकित सुनील वाल्मिकी असे आरोपी भावाचे नाव आहे. दोघेही इंदोरा चौकातील गोंधाणी हॉस्पिटलजवळील दर्ग्याशेजारी असलेल्या एकाच घरात वेगवेगळे राहतात.
घटनेच्या दिवशी सुमित हा दारू पिऊन घरी आला होता. त्यावेळी त्याची पत्नी त्याला समजावून सांगत असताना त्याचा भाऊ अंकित याने या वादात हस्तक्षेप केला. यावर सुमितने हा आमच्या घरातील विषय असून, तू यामध्ये पडू नकोस, असे अंकितला सुनावले. याच गोष्टीचा राग मनात धरून अंकितने घराजवळ पडलेली वीट उचलून सुमितच्या दिशेने फेकली. ही वीट थेट सुमितच्या उजव्या डोळ्याला लागल्याने तो जखमी झाला.
घटनेनंतर जखमी सुमितला तातडीने मानकापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी सुमितने दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपी अंकितविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
विशेष म्हणजे, आरोपी अंकित याच्याविरुद्ध यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांच्या नोंदीत आहे. या घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि इतर बाबींचा तपास जरीपटका पोलीस करीत आहेत.



