दिवाळीच्या रोषणाईत रक्तरंजित थरार! अमरावतीच्या महिंद्र कॉलनीत तरुणाची निर्घृण हत्या; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पांढरी हनुमान मंदिराजवळील टायटन जिमसमोर रविवारी रात्री १० वाजता घडली घटना; निकू उर्फ चैतन्य कचरेच्या हत्येने परिसरात खळबळ, BNS कलम १०३(१), ३(५) अंतर्गत कारवाई
अमरावती : एकीकडे संपूर्ण शहर दिवाळीच्या आनंदोत्सवात आणि रोषणाईत न्हाऊन निघाले असताना दुसरीकडे अमरावतीच्या महिंद्र कॉलनी परिसरात घडलेल्या रक्तरंजित घटनेने उत्सवाच्या आनंदावर विरजण पडले. रविवारी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास पांढरी हनुमान मंदिराजवळील टायटन जिमसमोर एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. निकू उर्फ चैतन्य राजेंद्र कचरे असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या रात्री महिंद्र कॉलनी परिसरात ही घटना घडली. पांढरी हनुमान मंदिराजवळील टायटन जिमसमोर चैतन्य कचरे याच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. ऐन दिवाळीच्या सणात तरुणाची हत्या झाल्याने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी राजू काळे, विशाल यादव, बुल्ल्या उर्फ अश्विन पहाडन आणि अश्विन टाले या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणाचे वडील राजेंद्र कचरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, या हत्येमागील नेमके कारण काय, आरोपींनी कोणत्या कारणावरून चैतन्य याच्यावर हल्ला केला आणि घटनेच्या वेळी नेमका काय घटनाक्रम घडला, याबाबत अधिक तपशील समोर येणे बाकी आहे. पोलिस तपासातून हत्येमागील कारण आणि घटनेचे संपूर्ण वास्तव स्पष्ट होणार आहे.
दिवाळीच्या रोषणाईत एका कुटुंबावर दुःखाचा काळोख पसरविणाऱ्या या घटनेने अमरावती शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. सणासुदीच्या काळात घडलेल्या या हत्याकांडामुळे महिंद्र कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



