citynewsMaharashtraNashik

गोदावरी नदीचा श्वास कोंडला! पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण शून्य; MPCB च्या अहवालातून प्रदूषणाचे धक्कादायक वास्तव

तपोवनातील पाण्यात BOD चे प्रमाण ८५ मिलीग्रॅम प्रतिलिटर; निर्धारित मर्यादेपेक्षा २८ पट अधिक असल्याचा दावा, गोदावरी स्वच्छ करण्यासाठी २२०० कोटींचे प्रकल्प

नाशिक : नाशिकची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) पाणी तपासणी अहवालातून नदीच्या प्रदूषणाची गंभीर स्थिती समोर आली आहे. गोदावरी नदीच्या तपोवन, दसक घाट आणि विविध संगम परिसरातून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण शून्य आढळल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. तर तपोवन परिसरातील पाण्यात बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड (BOD) चे प्रमाण तब्बल ८५ मिलीग्रॅम प्रतिलिटर नोंदवण्यात आले आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा हे प्रमाण कित्येक पटींनी अधिक असल्याने नदीतील जलचरांचे अस्तित्व आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीच्या स्वच्छतेसाठी प्रशासनाकडून सुमारे २२०० कोटी रुपयांचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ५ ऑक्टोबर रोजी गोदावरी नदीच्या विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले होते. तपोवन परिसरातील कपिला आणि गोदावरी संगम, दसक घाट तसेच नदीच्या इतर संगम परिसरातील पाण्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे (Dissolved Oxygen) प्रमाण शून्य आढळल्याचे अहवालात नमूद असल्याची माहिती समोर आली आहे. नदीच्या पाण्यातील ऑक्सिजन हा मासे आणि इतर जलचरांच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यास जलचरांच्या जगण्यावर परिणाम होतो. मात्र, त्याचे प्रमाण शून्यावर पोहोचल्यास जलचरांच्या अस्तित्वालाच गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गोदावरीतील ही स्थिती पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक मानली जात आहे.

केवळ विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाणच नव्हे, तर पाण्यातील जैविक प्रदूषणाची स्थिती दर्शवणारे BOD चे प्रमाणही धोकादायक असल्याचे समोर आले आहे. तपोवन परिसरातील पाण्यात BOD चे प्रमाण ८५ मिलीग्रॅम प्रतिलिटर आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. हे प्रमाण सामान्य मानल्या जाणाऱ्या मर्यादेपेक्षा सुमारे २८ पट अधिक असल्याचे सांगितले जात आहे. BOD म्हणजे पाण्यातील सेंद्रिय प्रदूषकांचे विघटन करण्यासाठी सूक्ष्मजीवांना लागणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण. BOD वाढणे म्हणजे पाण्यात सेंद्रिय प्रदूषणाचे प्रमाण अधिक असण्याचे संकेत. यामुळे पाण्यातील उपलब्ध ऑक्सिजन झपाट्याने कमी होऊ शकतो. परिणामी जलचरांच्या जीवनचक्रावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते.

या प्रदूषणामुळे गोदावरीच्या पाण्याचा मानवी वापर तसेच शेतीसाठी होणाऱ्या वापराबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. यापूर्वी उच्च न्यायालयाने संबंधित नदीपात्रातील पाणी मानवी वापरासाठी अयोग्य आणि आरोग्यास धोकादायक असल्याचे नमूद केल्याचा उल्लेखही केला जात आहे. त्यामुळे MPCB च्या अहवालाने गोदावरीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. नदीत मिसळणारे सांडपाणी, त्यावरील अपुरी प्रक्रिया आणि प्रदूषण नियंत्रणातील त्रुटी यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसाठी सुमारे २२०० कोटी रुपये खर्च केले जात असल्याची माहिती दिली आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत या प्रकल्पांची कामे पूर्ण होतील आणि त्यानंतर दूषित पाणी गोदावरी नदीत जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. या प्रकल्पांमुळे नदीत थेट मिसळणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून प्रदूषण कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांनीही सांडपाणी वाहून नेणाऱ्या नेटवर्कचे काम सुरू असल्याची माहिती दिली आहे. हे नेटवर्क पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईपर्यंत Interception आणि Diversion या पद्धतींचा वापर करून सांडपाणी नदीपात्रात जाण्यापासून रोखण्याची व्यवस्था केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या उपाययोजनांचा प्रत्यक्ष परिणाम नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेत किती आणि कधी दिसून येतो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

विशेष म्हणजे, ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कुंभमेळ्याच्या तयारीला अधिकृत सुरुवात झाली आहे. यावेळी पर्यावरण संरक्षण आणि कचरा व्यवस्थापनावर विशेष भर देण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. त्यामुळे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

मात्र, कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प आणि मोठमोठ्या घोषणांनंतरही गोदावरीच्या प्रदूषणावर प्रत्यक्ष नियंत्रण कधी मिळणार, हा प्रश्न कायम आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होणार का? नदीत मिसळणारे दूषित पाणी पूर्णपणे रोखले जाणार का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोदावरीच्या पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण पुन्हा वाढणार का? या प्रश्नांची उत्तरे आगामी काळात मिळणे आवश्यक आहे.

कारण गोदावरीचा प्रश्न केवळ नदीच्या स्वच्छतेपुरता मर्यादित नाही. या नदीवर अवलंबून असलेल्या लाखो नागरिकांचे आरोग्य, शेतकऱ्यांची शेती, जलचरांचे अस्तित्व आणि कोट्यवधी भाविकांची श्रद्धा यांच्याशी तो जोडलेला आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी स्वच्छतेच्या घोषणा नव्हे, तर प्रत्यक्ष कृती आणि त्याचे परिणाम महत्त्वाचे ठरणार आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button