नागपुरात एमडी ड्रग्सविरोधात कारवाई; ७.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

गणेशपेठ परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाची धडक; दोघे ताब्यात, आणखी दोघांचा शोध सुरू
नागपूर : नागपूर शहरातील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत साखळे गुरुजी शाळेमागील रस्त्यावर केलेल्या कारवाईत ७.११० ग्रॅम एमडी ड्रग्ससदृश पावडरसह एकूण ७ लाख २६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, अन्य दोघांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९.१५ ते ११.३० वाजेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपींकडून ७.११० ग्रॅम एमडी ड्रग्ससदृश पावडर आढळून आली. त्याची किंमत ७१ हजार १०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
मोबाईल, मोपेड आणि कारही जप्त
या कारवाईत ७१ हजार १०० रुपये किमतीची एमडी ड्रग्ससदृश पावडर, विविध कंपन्यांचे तीन मोबाईल (१ लाख ५५ हजार रुपये), एक अॅक्टिव्हा मोपेड (१ लाख ५० हजार रुपये) आणि रेनॉल्ट स्काला कार (३ लाख ५० हजार रुपये) असा एकूण ७ लाख २६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोघे ताब्यात; आणखी दोघांचा शोध
या प्रकरणात शेख फैजान शेख असलम (वय २४, रा. हरपून नगर, बडा राजबाग, सक्करदरा, नागपूर) आणि मोहिद अहमद अब्दुल अनीस (वय २५, रा. टीचर्स कॉलनी, ठाकूर प्लॉट, बडा ताजबाग, सक्करदरा, नागपूर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
तर अमन इंगळे आणि संदीप कश्यप (दोघेही रा. रामबाग, मैत्री बुद्ध विहार, इमामवाडा, नागपूर) हे पाहिजे आरोपी असून, त्यांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५६०/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २२(ब) आणि २९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर यांनी दिली.



