
२६ वर्षांनंतर काँग्रेसची सत्ता संपुष्टात; नव्या संचालक मंडळासमोर ५५० कोटींची आर्थिक तूट भरून काढण्याचे आव्हान
यवतमाळ : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (YDCC) अध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गट) खासदार संजय देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी भाजपचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय जाधव यांची निवड करण्यात आली. विशेष सभेत या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले.

बँकेच्या सत्तांतरानंतर झालेल्या या निवडीकडे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागले होते. तब्बल २६ वर्षांनंतर काँग्रेसची सत्ता संपुष्टात आणत महायुतीच्या बळीराजा सहकार पॅनेलने बँकेवर १६ जागांसह बहुमत मिळवले होते. त्यानंतर आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची जबाबदारी नव्या नेतृत्वाकडे सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, नव्या संचालक मंडळासमोर बँकेची सुमारे ५५० कोटी रुपयांची आर्थिक तूट भरून काढणे, वाढता एनपीए कमी करणे आणि शेतकऱ्यांना सुरळीत कर्जपुरवठा उपलब्ध करून देणे, अशी महत्त्वाची आव्हाने असणार आहेत. त्यामुळे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी कोणती पावले उचलली जातात, याकडे शेतकरी आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
नवनियुक्त अध्यक्ष संजय देशमुख तसेच उपाध्यक्ष नितीन भुतडा आणि विजय जाधव यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
बातमी : दुर्गेश कान्हु, यवतमाळ



