citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

पंचशील नगरात जुन्या वादातून ३३ वर्षीय तरुणावर चाकूहल्ला

२१ वर्षीय आरोपीविरुद्ध सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा; जखमीवर मेयो रुग्णालयात उपचार सुरू

नागपूर : नागपुरातील पाचपावली परिसरात जुन्या वस्तीतील वादातून एका ३३ वर्षीय तरुणावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. पंचशील नगरातील सारीपुत्र बुद्ध विहाराजवळ ३१ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी २१ वर्षीय आरोपीविरुद्ध सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोलू कैलाश शेवारे (वय ३३) हा तरुण पंचशील नगर परिसरात वस्तीतील एका व्यक्तीच्या घराजवळ उभा होता. यावेळी अक्षय उर्फ भेंड्या राजेश बोदले (वय २१) याने त्याच्यावर चाकूने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गोलू गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी जखमीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी आरोपी अक्षय बोदले याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११० अन्वये सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन अंसापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध सुरू असून, पाचपावली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button