प्रेमविवाहाला नकार मिळताच तरुण चढला मोबाईल टॉवरवर; पिंपरी-चिंचवडमध्ये साडेतीन तास ‘शोले स्टाईल’ ड्रामा!

प्रेयसीने लग्नाला होकार दिल्यानंतर अग्निशमन दलाकडून तरुणाची सुखरूप सुटका; मामुर्डी परिसरातील घटनेने उडाली खळबळ
पिंपरी-चिंचवड : चित्रपटातील ‘शोले’मधील धर्मेंद्रचा पाण्याच्या टाकीवर चढून लग्नासाठी हट्ट धरणारा प्रसंग आठवतोय? असाच काहीसा प्रकार पिंपरी-चिंचवडमधील मामुर्डी परिसरात प्रत्यक्षात पाहायला मिळाला. प्रेमविवाहाला नकार मिळाल्याने एका तरुणाने थेट मोबाईल टॉवरवर चढून ठिय्या दिला. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या नाट्यमय प्रकारानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तरुणाची सुखरूप सुटका केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रविवारी संध्याकाळी मामुर्डी परिसरातील गहुंजे रोडवर नागरिकांची नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती. याचदरम्यान एका उंच मोबाईल टॉवरवर तरुण चढून बसल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुरुवातीला या प्रकारामागचे कारण स्पष्ट झाले नव्हते. मात्र, चौकशीदरम्यान प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याचे समोर आले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाच्या प्रेयसीने कुटुंबीयांचा विरोध असल्याने प्रेमविवाह शक्य नसल्याचे सांगत लग्नास नकार दिला होता. त्यामुळे नाराज झालेल्या तरुणाने लग्नासाठी थेट मोबाईल टॉवरवर चढण्याचे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलासह पीएमआरडीएच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, टॉवरखाली उभ्या असलेल्या प्रेयसीने तरुणाला खाली उतरण्याची विनंती केली. तसेच, ‘तू खाली ये, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे,’ असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर अत्याधुनिक ब्रांटो वाहनाच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. जवानांनी तब्बल साडेतीन तास प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेर तरुणाला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात अग्निशमन दलाला यश आले.
सुटकेनंतर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी तरुणाचे समुपदेशन करत स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालणारे असे कृत्य पुन्हा करू नये, असा सल्ला दिला. प्रेम आणि लग्नासारख्या वैयक्तिक विषयांवरून जीव धोक्यात घालण्याचे टोकाचे पाऊल उचलणे किती धोकादायक ठरू शकते, याची जाणीव या घटनेने पुन्हा करून दिली. सुदैवाने अग्निशमन जवानांच्या तत्परतेमुळे तरुणाचे प्राण वाचले.



