citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणावर चाकूहल्ला; यशोधरानगरात तिघांना अटक

घरामागे नेऊन केली मारहाण; छातीच्या उजव्या बाजूला चाकूने वार, जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू

नागपूर : जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाला घराबाहेर बोलावून त्याच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास फिर्यादी आकाश साहेबराव शिर्के (वय २५, रा. वांजरी जुनी वस्ती, वंदेवी नगर, यशोधरानगर, नागपूर) यांचा भाऊ रमेश साहेबराव शिर्के (वय ३६) हा रेल्वे पटरी, गुलशन नगर परिसरातून घरी परत आला होता. यावेळी आरोपींपैकी एकाने त्याला घराबाहेर बोलावले. महिनाभरापूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर त्याला फिर्यादीच्या घरामागे नेऊन सर्व आरोपींनी हातबुक्क्यांनी मारहाण केली.

दरम्यान, आरोपींपैकी एकाने जवळील चाकूने रमेशच्या छातीच्या उजव्या बाजूला वार केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. जखमी रमेशला उपचारासाठी राणी दुर्गावती नगर येथील अनिरुद्ध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी फिर्यादी आकाश शिर्के यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११०, ११५(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातील आरोपींमध्ये मयूर राजेश साखरे (वय ३०, रा. माजरी, पार्वती नगर, नागपूर), राहुल मनोज बाळबुधे (वय २६, रा. प्रवेश नगर, नागपूर), मोहम्मद कलीम मोहम्मद आरिफ अन्सारी (वय २४, रा. गुलशन नगर, नागपूर) आणि अमन विजय शहू (वय २२, रा. गुलशन नगर, नागपूर) यांचा समावेश असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यशोधरानगर पोलिसांनी तक्रारीची दखल घेत गुन्हा दाखल केला. तातडीने तपासाची चक्रे फिरवत तीन आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपीचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button