आर्वी पोलिसांची गांजा तस्करावर धडक कारवाई!

४ किलो ९१० ग्रॅम गांजासह २ लाख २८ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त; ४३ वर्षीय आरोपी अटकेत
आर्वी : गांजाची वाहतूक करून चिल्लर विक्रीसाठी आणणाऱ्या एका आरोपीवर आर्वी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी ४ किलो ९१० ग्रॅम गांजा, मोपेड, मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण २ लाख २८ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी आर्वी-वर्धा रोडवरील एसटी डेपोसामोर सापळा रचला. संशयित मोपेडची तपासणी केली असता डिक्कीमध्ये प्लास्टिक पिशवीत गांजा आढळून आला. या प्रकरणी शेख गुड्डू शेख आशिक, वय ४३ याला ताब्यात घेण्यात आले.
जप्त मुद्देमालात ९८ हजार २०० रुपये किमतीचा ४ किलो ९१० ग्रॅम गांजा, १ लाख २० हजार रुपयांची मोपेड, १० हजार रुपयांचा मोबाईल तसेच इतर साहित्याचा समावेश आहे.
आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आर्वी पोलीस करीत आहेत.



