AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावती-बडनेरा मार्गावर वाहतूक कोंडीचा फटका; रस्त्याच्या कामामुळे नागरिक त्रस्त

खंडेलवाल लॉन आणि न्यू तापडिया मॉलसमोर वाहतुकीचा खोळंबा; सूचना फलक आणि वाहतूक पोलिसांची व्यवस्था नसल्याचा आरोप

अमरावती : अमरावती-बडनेरा मार्गावर खंडेलवाल लॉन आणि न्यू तापडिया मॉलसमोर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्याचे काम प्रगतीपथावर असताना या ठिकाणी योग्य नियोजन आणि वाहतूक व्यवस्थेचा अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.

या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याची पूर्वसूचना देणारे कोणतेही ठोस सूचना फलक लावण्यात आलेले नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरील परिस्थितीचा अंदाज येत नसून, विशेषतः द्विभाजकाजवळ वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. या भागात दररोज किरकोळ अपघात घडत असल्याचीही नागरिकांची तक्रार आहे.

अमरावती ते बडनेरा जाणारा मार्ग या ठिकाणी तुलनेने अरुंद असल्याने महामंडळाच्या बसेस तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीवर अतिरिक्त ताण पडत आहे. परिणामी काही वेळा या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत असून, नागरिकांना उष्ण आणि दमट वातावरणात बराच वेळ अडकून राहावे लागत आहे.

येत्या काळात सणासुदीचे दिवस सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर या परिसरात मोठ्या प्रमाणात रास गरबा प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात. त्यामुळे या मार्गावरील वाहनांची व नागरिकांची वर्दळ आणखी वाढण्याची शक्यता आहे. रस्त्याचे काम सुरू असतानाच वाहतूक कोंडीची समस्या कायम राहिल्यास सणासुदीच्या काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची नियमित व्यवस्था नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे रस्त्याचे काम सुरू असलेल्या भागात वाहनांची ये-जा नियंत्रित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी पुरेसे सूचना फलक, दिशादर्शक चिन्हे आणि सुरक्षेची व्यवस्था करावी. तसेच गर्दीच्या वेळेत वाहतूक पोलिसांची नियुक्ती करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन वाहतूक कोंडी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button